महत्वाच्या बातम्या

 ऑक्टोंबरमध्ये कमी पावसाची शक्यता पाणी व शेती नियोजनावर भर देण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर तसेच मान्सूनोत्तर कालावधीसाठी हवामानाचा हंगामी अंदाज प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये देशाचे एकूण पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या 85 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिंचनाचे नियोजन तसेच शेतीतील पाण्याचा कार्यक्षम वापर यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. भारतीय हवामान विभागानेही पाण्याची उपलब्धता नियमितपणे तपासणे, सिंचन संसाधनांचा योग्य वापर करणे, जलसंवर्धन व पाण्याची बचत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना आवाहन -
ऑक्टोबर महिन्यातील संभाव्य कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पिकांच्या पाण्याची गरज, सिंचनाची उपलब्धता आणि स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन कृषी व्यवस्थापन करावे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी पर्जन्यमानामुळे मातीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता, सिंचनाची गरज आणि कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते.

तापमानात वाढीची शक्यता -
ऑक्टोबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तसेच किमान तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याने उष्णतेचा परिणाम, पाण्याची वाढती मागणी आणि पिकांवरील ताण याबाबतही संबंधित यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

नागरिकांना आवाहन -
घरगुती वापरातील पाण्याची नासाडी टाळा व आवश्यक तेवढेच पाणी वापरा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या स्रोतांचा काटकसरीने वापर करा, घरातील गळतीचे नळ व पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करा, वाहन, अंगण, रस्ते धुणे यासाठी पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळा, उपलब्ध पावसाचे पाणी व घरगुती पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा, नागरिकांनी स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्था व प्रशासनाच्या सूचनांना सहकार्य करावे. शेतकरी बांधवांनी उपलब्ध सिंचन पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिकांच्या पाण्याचे नियोजन करावे. तापमान वाढीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळेत अनावश्यक उन्हात जाणे टाळावे व पुरेसे पाणी प्यावे.

आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ०७१५२-२४३४४६/२९९०१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos