मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ : अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, ती पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त सूचनांनुसार हे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हा पुनरीक्षण कार्यक्रम १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा आहे. नोटीस टप्पा तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती वाढीव मुदतीत दाखल कराव्यात, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी कळविले आहे.




Petrol Price




