महत्वाच्या बातम्या

 ७५० वृक्षांची लागवड : नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे


- कोटगुल पोलिसांचा हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानात सहभाग; मोहल्ला व शांतता समितीच्या बैठकीत सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र तसेच १० कोटी वृक्षलागवड अभियानाला कोटगुल पोलिसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोलिस ठाणे परिसरात तब्बल ७५० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धनासोबतच नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहल्ला समिती व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शुक्रवारी कोटगुल पोलिस ठाणे परिसरात वृक्षलागड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत करंज २००, चिंच २००, आपटा ३०० आणि अंजन ५० अशा एकूण ७५० रोपांची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे जिओ-टॅगिंगही करण्यात आले. या उपक्रमात जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन -
दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी कोटगुल पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक नागेश टेकाम यांच्या उपस्थितीत मोहल्ला समिती तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांनी स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे संरक्षण करावे आणि सायबर सुरक्षेचा संदेश गावागावांत पोहोचवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

बँक खाते, ओटीपी, पासवर्ड अनोळखी व्यक्तींना देऊ नका -
सायबर पाठलाग, अश्लील मजकूर अथवा छायाचित्रांचा प्रसार, इंटरनेटवरील मजकूर व छायाचित्रांमध्ये संगणकाच्या माध्यमातून फेरफार, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आदी सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे पोलिसांनी सांगितले.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीस बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती, ओटीपी, पासवर्ड अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये. तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क -
सायबर फसवणुकीची घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले. फसवणुकीनंतर तत्काळ तक्रार केल्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे विलंब न करता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस कोटगुल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १५ मोहल्ला व शांतता समिती सदस्य उपस्थित होते. वृक्षलागवड मोहीम तसेच सायबर जनजागृती उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटगुल पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





  Print






Related Photos