महत्वाच्या बातम्या

 कापूस लागवडीसाठी शेतात गेल्या अन् काळाचा घाला : आठ महिलांवर वीज कोसळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कापूस लागवडीसाठी शेतात गेलेल्या महिलांवर अचानक आभाळातून काळाचा घाला आला. ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही येथे गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या आठ महिलांवर वीज कोसळल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेने परिसर हादरला असून, एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

जना मारुती तलमले, रामरी मारुती तलमले, मनीषा रामहरी तलमले, शुभांगी सुभाष तलमले, सुभाष मारुती तलमले, मनीषा गोकुळदास ठाकरे, मेघा राकेश शेंडे आणि कविता कमलाकर पाकडे या आठ महिला वीज पडल्याने जखमी झाल्या.

दुपारच्या वेळी शेतात कपाशीची लागवड सुरू असतानाच अचानक वीज कोसळली. काही क्षणांतच शेतातील वातावरणात आरडाओरड सुरू झाली. जखमी महिलांना तातडीने आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, मनीषा गोकुळदास ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दररोजच्या उदरनिर्वाहासाठी शेतात कष्ट करणाऱ्या महिलांवर अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या कुटुंबीयांवरही चिंतेचे सावट पसरले आहे. या घटनेने बरडकिन्ही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos