एसएनडीटीत रोजगार कौशल्यावर सात दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थिनींना रोजगाराच्या क्षेत्रात सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर केंद्र आणि महिंद्रा राईज–नांदी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार कौशल्य या विषयावरील सात दिवसीय कार्यशाळेचा समारोप बुधवार, २ सप्टेंबर रोजी उत्साहात झाला. यावेळी सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर केंद्र येथे अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या कार्यशाळेत सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता धोटे यांनी मुलाखत कौशल्य, संभाषण कौशल्य, रोजगार क्षेत्रातील विविध बारकावे, आर्थिक नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, व्यवसाय तसेच गुंतवणूक आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी सातही दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
समारोप कार्यक्रमाला एसएनडीटी बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच मार्गदर्शक डॉ. प्राजक्ता धोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मिसबाह खान, नैना निषाद, अनुष्का ठाकूर, सबा खान, भाविक आणि अस्मिता चौहान या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत कार्यशाळेतील अनुभव सांगितले. रोजगाराच्या क्षेत्रात या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यार्थिनी केवळ सक्षम कर्मचारी बनण्यापुरत्या मर्यादित न राहता रोजगार निर्माण करणाऱ्या आणि रोजगारदात्या बनाव्यात, असे आवाहन केले. विद्यार्थिनींनी स्वरोजगाराच्या संधींचाही विचार करावा. त्यातूनच अशा कार्यशाळांची खरी उपयोगिता सिद्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच कार्यशाळेसाठी डॉ. प्राजक्ता धोटे यांचे आभार मानले. डॉ. वेदानंद अलमस्त यांनी उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींनी विविध कौशल्ये आत्मसात करून कार्यक्षम होण्याचे आवाहन केले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. प्राजक्ता धोटे यांनी विद्यार्थिनींनी कोणत्याही पूर्वधारणा किंवा भीती न बाळगता आत्मविश्वासाने प्रगती करावी, असे आवाहन केले. तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शीतल बिलोरे यांनी केले. यावेळी अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींसह प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




