महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन : युवकांना विविध क्षेत्रांत रोजगाराची संधी


- पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभांतर्गत आयोजन; आठ ठिकाणी पूर्वनोंदणीची सुविधा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभांतर्गत राज्यभरात ५०० हून अधिक रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना विविध उद्योग, आस्थापना तसेच खासगी क्षेत्रातील उपलब्ध रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर मिळणार आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव आणि आवड लक्षात घेऊन त्यांना उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.

पूर्वनोंदणी आवश्यक -
रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील युवक-युवतींनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, कौशल्ये, कामाचा अनुभव तसेच इतर आवश्यक माहिती अद्ययावत स्वरूपात भरावी.

नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीपूर्व तयारीसाठी नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलाखतपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगार मिळविण्याची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

आठ ठिकाणी नोंदणीची सुविधा -
नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध ऑनलाइन लिंकद्वारे नोंदणी करावी. तसेच प्रत्यक्ष नोंदणीसाठी जिल्ह्यातील पुढील महाविद्यालये व संस्थांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे : १. एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शहापूर, भंडारा २. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर ३. गुरुकुल खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी ४. मनोहरभाई पटेल कॉलेज, साकोली ५. मायनिंग खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर ६. ज. मु. पटेल कॉलेज, भंडारा ७. संत जगनाडे खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी ८. अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी, वरठी, ता. मोहाडी युवक-युवतींनी आपल्या नजीकच्या केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करावी किंवा उपलब्ध ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगार देणाऱ्या आस्थापनांनाही नोंदणीचे आवाहन -
जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यास इच्छुक असलेल्या उद्योग, आस्थापना आणि खासगी संस्थांनीही या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित आस्थापनांनी स्वतंत्र ऑनलाइन लिंकद्वारे नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करावी.

उद्योग व आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यास रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे -
जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ही महत्त्वाची संधी असून, उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी वेळेत नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, भंडारा यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क -
रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बसस्थानकाजवळ, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे संपर्क साधता येईल.

तसेच दूरध्वनी क्रमांक ०७१८४-२५२२५० वर संपर्क साधावा किंवा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos