महत्वाच्या बातम्या

 लोक सहभागातून दोन गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : दुष्काळी परिस्थितीत १५ ते २० हेक्टर क्षेत्रातील पिकांना मिळणार जीवनदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून मौजा नांदगाव पोडे आणि मौजा कवडजई येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.

यावर्षी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका पिकांना बसत आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असताना कृषी विभागाने पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. या बंधाऱ्यांमुळे उपलब्ध पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी वापर करणे शक्य होणार आहे. विशेषतः परिसरातील सुमारे १५ ते २० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या जलसाठ्याचा लाभ होणार असून पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.

मौजा नांदगाव पोडे येथे वनराई बंधारा उभारणीच्या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी निखिल पिंपळशेंडे, गणेश आमने, शुभम येरगुडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तर मौजा कवडजई येथे सहाय्यक कृषी अधिकारी घनश्याम टाले, ग्रामपंचायत अधिकारी मिलिंद देवगडे आणि शेतकरी बांधवांनी श्रमदान करून बंधाऱ्याच्या उभारणीत सहभाग घेतला.

दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातून केलेले श्रमदान हे जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहे. शासनाच्या योजनांसोबतच ग्रामस्थांनी सामूहिक पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर स्थानिक पातळीवर उपाययोजना करता येतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. भविष्यात अशाच प्रकारे जलसंधारणाची कामे राबविल्यास भूजलपातळी वाढण्यासह शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.





  Print






Related Photos