कॉलेजला जाते म्हणत घरातून निघाली अल्पवयीन मुलगी : चार दिवसांपासून बेपत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ‘कॉलेजमध्ये जायचे आहे’ असे सांगून घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. चार दिवसांपासून तिचा शोध सुरू असून, अखेर कुटुंबीयांनी बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता सदर मुलीने आपल्या आईकडे १०० रुपये मागितले.
कॉलेजमध्ये जायचे आहे’ असे सांगून ती दप्तर घेऊन घरातून निघाली. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. सायंकाळी कुटुंबीयांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. नातेवाईक, मैत्रिणी व परिचितांकडे चौकशी करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला.
दरम्यान, घरातील कागदपत्रे ठेवलेल्या पेटीची पाहणी केली असता मुलीने आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक पासबुक तसेच काही कपडे सोबत नेल्याचे आढळून आले. बँक खात्याची तपासणी केली असता तिने यापूर्वी आधारकार्डच्या आधारे बँकेतून पैसे काढल्याचेही समोर आले. मोबाइल अद्याप बंद असून, सर्वतोपरी शोध घेऊनही मुलीचा ठावठिकाणा लागलेला नाही.
त्यामुळे तिला कोणीतरी पळवून नेले असण्याची शक्यता व्यक्त करत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहे. बेपत्ता मुलगी सावळ्या रंगाची, सुमारे पाच फूट उंचीची व सडपातळ बांध्याची असून तिचे केस काळे व लांब आहेत. ती घरातून निघताना कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले होते, याची माहिती उपलब्ध नाही.




Petrol Price




