घरातून सुरू होता हातभट्टी दारूचा धंदा : जिवती पोलिसांनी दोघांना दिला दणका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिवती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झानेरी आणि मालगुडा येथे अवैध हातभट्टी मोहादारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत एकूण ३० लिटर हातभट्टी मोहादारू आणि ९० लिटर मोहासडवा, असा एकूण १२० लिटर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सखुबाई देविदास राठोड ५६ वर्ष रा. झानेरी आणि माधव मारोती आडे ३८ वर्ष रा. मालगुडा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१३ सप्टेंबर रोजी पोलिसांना झानेरी येथील सखुबाई राठोड ही घरातून हातभट्टी मोहादारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तिच्या घराची पाहणी केली. यावेळी छपरीच्या एका कोपऱ्यात ५ लिटरच्या डबक्यांमध्ये २५ लिटर हातभट्टी मोहादारू आढळून आली.
तसेच घागरीमध्ये ६० लिटर मोहासडवा मिळून आला. या मुद्देमालाची एकूण किंमत ४ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. यानंतर मालगुडा येथेही पोलिसांनी कारवाई केली. माधव आडे याच्या घराच्या परिसराची पाहणी केली असता ५ लिटरच्या डबक्यात ५ लिटर हातभट्टी मोहादारू आणि दोन घागरीमध्ये ३० लिटर मोहासडवा आढळून आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ हजार ५५० रुपये आहे.
दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या मोहादारू व मोहासडवा नष्ट करण्यात आला. आरोपी सखुबाई राठोड व माधव आडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.




Petrol Price




