गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा गोडलवाही येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन


- या शिबीरादरम्यान पोमके गोडलवाही हद्दीतील एकूण १०१ नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी
- पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम
- आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल करण्यात आली जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने १३ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा गोडलवाही येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश चिचघरे, डॉ. रोशनी किरंगे, रेवतीकांत गराडे औषधी निर्माण अधिकारी सोनाली कुमरे अधिपरिचारीका यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरादरम्यान हद्दीतील सुमारे १०१ नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करुन आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आजपावेतो गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन २०२१ पासून एकूण २१९ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण ५०,००० हजार पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण ०६ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ४,८६४ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे.
यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण १,४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात कार्यरत असतांना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-६० जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे., तसेच सहा. पोलीस अधीक्षक, पेंढरी कॅम्प कारवाफा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें गोडलवाहीचे पोउपनि. अजिंक्य इथापे, पोउपनि. ज्ञानेश्वर सोलंकी व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.




Petrol Price




