महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी : मुख्यमंत्र्यांचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील नागरिकांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासह वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बल्लारपूर शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अपर मुख्य सचिव (गृह) यांना नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बल्लारपूर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

औद्योगिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बल्लारपूर शहरात नागरिकांना सुरक्षित वातावरणात निर्भयपणे वावरता यावे, तसेच गुन्हेगारीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आमदार मुनगंटीवार यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, संवेदनशील ठिकाणे तसेच शहरात येण्या-जाण्याच्या प्रमुख मार्गांवर उच्चक्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रस्तावित प्रणालीमध्ये आधुनिक नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही फुटेजच्या रेकॉर्डिंग व साठवणुकीची व्यवस्था, आवश्यक नेटवर्किंग आणि अखंडित वीजपुरवठ्यासाठीच्या सुविधांचा समावेश असणार आहे. या यंत्रणेमुळे शहरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हे घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक दृश्य पुरावे उपलब्ध करून घेणे पोलिसांना अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांनी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळून आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या मागणीची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत अपर मुख्य सचिव (गृह) यांना नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आता संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रस्तावाला मान्यता आणि आवश्यक निधी मिळाल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.

शहरातील प्रमुख ठिकाणांवर आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलिसांच्या तपासाला तांत्रिक आधार मिळू शकतो. तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ होण्यास मदत होईल. बल्लारपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रस्तावाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos