महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात २,५५५ हेक्टरवर मोहरी लागवडीचे नियोजन


- भात कापणीनंतर पडीक राहणाऱ्या शेतजमिनीचा रब्बी हंगामात होणार उपयोग; पीक विविधीकरणातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक विविधीकरणाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने यंदा २ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवडीचे नियोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खरीप हंगामात भातपिकाची कापणी झाल्यानंतर अनेक ठिकाणी पडीक राहणाऱ्या शेतजमिनीचा उत्पादक वापर करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

गडचिरोली जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक आहे. मात्र, भात कापणीनंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतजमीन रब्बी हंगामात पडीक राहते. त्यामुळे उपलब्ध शेतीक्षेत्राचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. अशा जमिनीवर मोहरीसारख्या तेलबिया पिकाची लागवड केल्यास रब्बी हंगामातही शेती उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यामुळे पारंपरिक पीक पद्धतीला पर्याय उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यात २,५५५ हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोहरी पिकाच्या लागवडीविषयी जनजागृती करण्यात येत असून, इच्छुक शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे.

मोहरी लागवडीसाठी योग्य वाणांची निवड, दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता, पेरणीची पद्धत, योग्य कालावधी आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञान याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जात आहे. संबंधित तालुक्यांतील कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधून मोहरी लागवडीसाठी योग्य क्षेत्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. मोहरी हे तुलनेने कमी कालावधीत येणारे तेलबिया पीक असल्याने रब्बी हंगामात उपलब्ध जमिनीचा उपयोग
करण्यासाठी हा एक पर्याय ठरू शकतो. या उपक्रमामुळे जिल्ह्यात तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढविण्यासह स्थानिक तेलबियाउत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.

नियोजित क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न -
जिल्ह्यात निर्धारित २,५५५ हेक्टर क्षेत्रावर मोहरीची पेरणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन व क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची उपलब्धता आणि स्थानिक कृषी परिस्थिती विचारात घेऊन रब्बी हंगामात मोहरी लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. तसेच आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनासाठी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध शेतीक्षेत्राचा उत्पादक वापर वाढविणे, तेलबिया उत्पादनाला चालना देणे आणि शेतकऱ्यांसाठी
अतिरिक्त उत्पन्नाचे पर्याय निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos