महत्वाच्या बातम्या

 ब्रम्हपुरीत दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश : तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी येथे दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास करताना ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत १ लाख १० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे ब्रम्हपुरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात आरोपी प्रज्वल सिद्धार्थ पंचभाई रा. जुगनाळा, ता. ब्रम्हपुरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपला साथीदार आरोपी यश बाळू नगराळे रा. जुगनाळा याच्यासोबत मिळून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

२६ जानेवारी रोजी ब्रम्हपुरी येथील गणपती उत्सवाचा मेला पाहण्यासाठी आलेल्या वैभव रविंद्र मंद २१ वर्ष , रा. चौगान, ता. ब्रम्हपुरी यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रं एमएच ३४ एजे ६४४७ बाजार समितीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, मेला पाहून परत आल्यानंतर त्यांची मोटारसायकल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा क्रमांक ७३२/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रज्वल पंचभाई याची चौकशी करण्यात आली. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने ब्रम्हपुरी येथील मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत त्याने साथीदार यश नगराळे याच्यासोबत आरमोरी येथून आणखी दोन मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार सीडी डिलक्स क्रं एमएच ३६ एम ६१०४ किंमत ४० हजार रुपये आणि हिरो स्प्लेंडर प्लस क्रं. एमएच ३३ झेड २५८५ किंमत ४० हजार रुपये अशा दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचा नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम, पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी केले.





  Print






Related Photos