आठवड्यात दुसऱ्यांदा सागवान तस्करीवर वन विभागाचा घाव


- कोपेला-१ नियतक्षेत्रातून ३६ सागवान नग जप्त; लाकडाची किंमत २ लाख ५६ हजारांहून अधिक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : आसरअल्ली वन परिक्षेत्रात सागवान लाकडाची अवैध वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात वन विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली असून, कोपेला-१ नियतक्षेत्रातून वन पथकाने तब्बल ३६ नग सागवान लाकूड जप्त केले. जप्त केलेल्या लाकडाची अंदाजे किंमत २ लाख ५६ हजार ६२३ रुपये असून, त्याचे एकूण घनफळ २.१८ घनमीटर आहे.
वन विभागाला कोपेला-१ नियतक्षेत्र परिसरात सागवान लाकडाचा अवैध साठा करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने ३ सप्टेंबर रोजी संबंधित परिसरात पाहणी करून छापा टाकला. यावेळी तस्करांनी लपवून ठेवलेला सागवान लाकडाचा साठा पथकाच्या निदर्शनास आला.
वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करीत साठ्यातील ३६ सागवान नग ताब्यात घेतले. त्यानंतर जप्त केलेले लाकूड आसरअल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात अवैधरीत्या सागवान तोड करून त्याची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जप्त केलेले लाकूड कोणाचे आहे, तसेच ते कोठून आणण्यात आले आणि त्याची पुढे कुठे वाहतूक केली जाणार होती, याचा वन विभागाकडून तपास करण्यात येत आहे. संबंधित आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्याविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी पानगे यांनी दिली.
आसरअल्ली वन परिक्षेत्रात सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी वन विभागाने गस्त वाढविण्यासोबतच गुप्त माहितीच्या आधारे कारवाया सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात सागवान तस्करीविरोधात ही दुसरी मोठी कारवाई असल्याने वन विभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करी करणाऱ्यांविरोधात आपली भूमिका कठोर केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आणि उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने केली.




Petrol Price




