किटाडी जंगलात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ : संकरित गायीची केली शिकार

- महिलेवर बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच वाघाने गाय ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / लाखनी : तालुक्यातील किटाडी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर वाढला असून, वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका संकरित गायीची शिकार केली. या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली.
प्राप्त माहितीनुसार, किटाडी येथील शेतकरी मधुकर रणदिवे यांची गाय इतर जनावरांच्या कळपासह जंगलात चराईसाठी गेली होती. यावेळी लाखनी वन विकास महामंडळाच्या किटाडी जंगलातील बीट कक्ष क्रमांक ३८९ मध्ये दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गायीवर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गायीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी मधुकर रणदिवे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, किटाडी शिवारात पट्टेदार वाघासह बिबट्याचाही वावर वाढल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी थेट पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, ५ नोव्हेंबर रोजी किटाडी परिसरातील पिलांद्री शिवारात एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी वाघाने गायीची शिकार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि सलग घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच नागरिक व पशुधनाच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




