समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमास भेटी देऊन जाणून घेतल्या समस्या सेवा संकल्प अभियान, आरोग्य तपासणी शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, कार्यालय अधीक्षक दिपक कुसरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिंदी मेघे येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांचे दैनंदिन राहणीमान, उपलब्ध सोयी-सुविधा आरोग्यविषयक बाबी, भोजन व निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींची पाहणी केली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी भेटी देऊन सुविधा व समस्यांची पाहणी करत आहे. या भेटीत जेष्ठ नागरिकांच्या अडचणी व अपेक्षा जाणून आवश्यक त्या बाबींवर व्यवस्थापनास मार्गदर्शन करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना शासनामार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
सेवा संकल्प अभियानांतर्गत जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधा व योजनांचा लाभ मिळत आहे किंवा नाही याची पडताळणी करणे, तसेच वृद्धाश्रमातील निवास, भोजन, स्वच्छता व इतर मुलभुत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय व जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या पथकाद्वारे वृध्दाश्रमास भेट देण्यात आली.
यावेळी वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये उपस्थित जेष्ठ नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तशर्करा व इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. तपासणी दरम्यान आढळलेल्या आरोग्यविषयक बाबींनुसार संबंधितांना वैद्यकीय सल्ला, औषधोपचार व पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी समाज कल्याण विभागातीलमोहोड, साटोणे, राऊत, तामगाडगे, दवने आदी उपस्थित होते, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.




Petrol Price




