महत्वाच्या बातम्या

 जिल्हा ग्रंथालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन


- ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंजनाताई पाठक यांचे प्रतिपादन; वर्तुळ कथासंग्रहाचे प्रकाशन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाची संस्कृती, परंपरा, विचार आणि अस्मिता जपणारी जीवनधारा आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंजनाताई पाठक यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नागपूर येथे आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखिका प्रा. प्रणिताताई साल्पेकर तसेच राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाचे कार्यवाह आणि प्रसिद्ध रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक अनिल चनाखेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी ग्रंथप्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्यपरंपरा आणि वाचनसंस्कृती यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला साहित्यप्रेमी आणि वाचकांचा प्रतिसाद लाभला.

वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन -
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी यांनी अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे महत्त्व विशद केले. मराठी भाषेचा वारसा जतन करण्यासाठी वाचनसंस्कृती रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक घरात पुस्तके असावीत, घरातील मुलांच्या हातात पुस्तके असावीत आणि प्रत्येकाने नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी. त्याचबरोबर पुढील पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देऊन भाषेप्रती प्रेम आणि अभिमान निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचकांना विविध विषयांवरील साहित्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

वर्तुळ कथासंग्रहाचे प्रकाशन -
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ लेखिका प्रा. प्रणिताताई साल्पेकर यांच्या वर्तुळ या कथासंग्रहाचे प्रकाशन. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंजनाताई पाठक यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या प्रकाशनामुळे मराठी साहित्यविश्वातील नव्या साहित्यकृतीची वाचकांना ओळख झाली.

यावेळी प्रा. रंजनाताई पाठक यांनी अभिजात मराठी भाषेचा इतिहास आणि तिची समृद्ध साहित्यपरंपरा याविषयी मार्गदर्शन केले. भाषेच्या माध्यमातून समाजाचे सांस्कृतिक जीवन, परंपरा आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे भाषेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषेतील साहित्याचे वाचन, लेखन आणि प्रसार यांमधून भाषेची समृद्धी अधिक वाढविता येते, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा आणि ग्रंथसंस्कृती समृद्ध करण्याचा संकल्प -
लेखिका प्रा. प्रणिताताई साल्पेकर यांनी वर्तुळ या कथासंग्रहाविषयी विवेचन केले. पुस्तकाच्या लेखनप्रक्रियेबरोबरच कथासंग्रहातील साहित्यविषयक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. साहित्यनिर्मिती आणि वाचन यांचा परस्परांशी असलेला संबंध स्पष्ट करत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक अनिल चनाखेकर यांनी अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि ग्रंथसंस्कृती अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी तिचा दैनंदिन व्यवहारात वापर, साहित्याचे नियमित वाचन, नव्या पिढीमध्ये भाषेविषयी आवड निर्माण करणे आणि ग्रंथालयांशी नाते जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा तिच्या दीर्घ इतिहासाचा आणि समृद्ध साहित्यपरंपरेचा गौरव आहे. हा वारसा केवळ जतन न करता तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी नंदू बनसोड यांनी उपस्थित मान्यवर, साहित्यिक, वाचक आणि नागरिकांचे आभार मानले. यावेळी सूर्यकांत भोसले, लाखे तसेच साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून मराठी भाषेचे महत्त्व, साहित्यवाचनाची गरज आणि ग्रंथालयांची सामाजिक व सांस्कृतिक भूमिका अधोरेखित झाली. मराठी भाषेची समृद्ध परंपरा जपत वाचनसंस्कृतीचा विस्तार करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.





  Print






Related Photos