अंगारा परिसरातील बचतगटांच्या महिलांची बँकेकडून आर्थिक फसवणूक? : शेकडो महिला न्यायासाठी एकवटल्या

- आजाद समाज पार्टीची ६ऑक्टोबरला मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील अंगारा परिसरातील जवळपास २५ बचतगट आणि शेकडो महिलांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक आताची महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत कार्यरत असलेल्या BC (Business Correspondent) केंद्राच्या माध्यमातून अशिक्षित व ग्रामीण महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची तक्रार महिलांनी आजाद समाज पार्टीकडे केली आहे.
तक्रार प्राप्त होताच आजाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अंगारा येथे प्रत्यक्ष जाऊन पीडित महिला व बचतगटांची बैठक घेतली. यावेळी महिलांनी आपल्यासोबत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.
BC केंद्रातूनच गैरव्यवहार झाल्याचा महिलांचा आरोप-
महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगारा येथील विनोद नानाजी मेश्राम यांना तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या मालेवाडा शाखेअंतर्गत अंगारा येथे Business Correspondent (BC) केंद्र देण्यात आले होते. या केंद्रातून परिसरातील नागरिक आणि बचतगटांनी बँकेचे व्यवहार करावेत, अशा सूचना बँकेकडून देण्यात आल्याचे महिलांचे म्हणणे आहे.मात्र, याच केंद्रावर व्यवहार करताना अशिक्षित व ग्रामीण महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे.
महिलांनी केलेल्या प्रमुख आरोपांनुसार -
- पैसे निघाले नाहीत असे सांगून एकाच व्यवहारासाठी दोन-तीन वेळा अंगठा घेऊन अनेक व्यवहार करण्यात येत होते, असा आरोप आहे.
- उदाहरणार्थ, एखाद्या महिलेला केवळ ₹१,५०० काढायचे असताना तिच्या खात्यातील ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंतची रक्कम काढण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला.
- बचतगटाच्या खात्यातील रक्कम चुकीच्या सूचना देऊन इतरत्र वळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
- मनीषा महिला बचतगटाने ₹१ लाख कर्ज फेडले असतानाही पुन्हा ₹१ लाख कर्ज त्यांच्या खात्यावर दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे.
- काही महिलांच्या खात्यांचा गैरफायदा घेत लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.
अनेक महिला अशिक्षित असल्याने त्यांना आपल्या खात्यातून नेमके किती पैसे काढले गेले, कोणते व्यवहार झाले आणि खात्यावर कोणते कर्ज दाखवले आहे, याची माहिती बराच काळ मिळाली नसल्याचे महिलांनी सांगितले. खात्यांचे व्यवहार आणि पासबुक तपासल्यानंतर गैरव्यवहार त्यांच्या लक्षात आले.
तक्रार घेण्यास पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा आरोप -
या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी शेकडो महिला दोन ट्रॅक्टरमधून मालेवाडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या, मात्र त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा आरोप महिलांनी आजाद समाज पार्टीच्या बैठकीत केला. यानंतर महिलांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्याकडेही आपली व्यथा मांडली, मात्र त्यानंतर अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप महिलांनी केला.
महिलांची व्यथा ऐकल्यानंतर आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी तत्काळ मालेवाडा पोलीस निरीक्षकांशी फोनवरून संपर्क साधून प्रकरणाची विचारणा केली. यावेळी पोलीस निरीक्षकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन देत महिलांना सोबत घेऊन येण्यास सांगितल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
०६ ऑक्टोबर रोजी महिलांना सोबत घेऊन मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक देणार असल्याचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. गरीब, ग्रामीण आणि अशिक्षित महिलांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित हा गंभीर विषय असून प्रशासनाने केवळ तक्रार स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका आजाद समाज पार्टीने घेतली आहे.
बैठकीला आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महासचिव अंकुश कोकोडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम आणि मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व बचतगटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
- आजाद समाज पार्टी गडचिरोली




Petrol Price




