महत्वाच्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत भंडारा जिल्ह्यातील २० हजार ९२२ शेतकऱ्यांना १३७.१९ कोटींची कर्जमाफी


- आधार प्रमाणीकरण न केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील आतापर्यंत २० हजार ९२२ थकीत शेतकरी कर्जदारांना १३७.१९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे.

कर्जमुक्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ३० हजार ५९४ कर्जखात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. संगणकीय प्रक्रियेनंतर यापैकी निकषानुसार पात्र ठरलेल्या २५ हजार ३४७ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आतापर्यंत तीन टप्प्यांत कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख १० हजार ४५ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९.८४ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ४६६ शेतकऱ्यांच्या खात्यात ४०.४१ कोटी रुपये, तर तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर २०२६ रोजी ९१९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६.४९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १८ हजार ४३० थकीत शेतकरी कर्जदारांना ११६.७३ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.

राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमार्फतही कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ६५१ शेतकऱ्यांच्या खात्यात ५.४२ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात ७३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५.५६ कोटी रुपये, तर तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर २०२६ रोजी १ हजार १०५ शेतकऱ्यांच्या खात्यात ९.४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील कर्जखात्यांचा एकत्रित विचार करता २० हजार ९२२ थकीत शेतकरी कर्जदारांना १३७.१९ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून सदर रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या लाभार्थी यादीतील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केलेले नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

योजनेच्या निकषानुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे उपनिबंधक विलास देशपांडे यांनी केले आहे.





  Print






Related Photos