आरोग्य, तंदुरुस्ती आणि आनंदाचा संगम : इनरव्हील क्लबतर्फे योगा-झुंबा वर्कशॉप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : इनरव्हील क्लब ऑफ वरोरातर्फे १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता Shape In Womens Fitness Gym येथे महिलांसाठी योगा व झुंबा वन-डे वर्कशॉप उत्साहात आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन क्लब सदस्या व Shape In Womens Fitness Gymच्या संचालिका झेनब सिद्धीकोट यांच्या सहकार्याने करण्यात आले. त्यांनी उपस्थित महिलांना नियमित योगाचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्थैर्य, लवचिकता व तंदुरुस्ती यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. तसेच संगीताच्या तालावर केला जाणारा झुंबा हा आनंददायी व उत्साहवर्धक व्यायामप्रकार असून, त्यातून शरीरासोबतच मनही प्रसन्न राहण्यास मदत होते, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत महिलांकडून प्रत्यक्ष योगासने व झुंबाचा सराव करून घेण्यात आला. योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा तसेच नियमित व्यायामाच्या माध्यमातून निरोगी व सक्रिय जीवनशैली जोपासावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष स्नेहल पत्तीवार, सचिव प्राजक्ता कोहळे, दर्शना मोदी, प्रिया टोंगे, दीपाली टिपले, पूजा मुंडाडा तसेच झेनब सिद्धीकोट यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन योगा व झुंबाचा आनंद घेतला. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार पडला.




Petrol Price




