महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी जमावबंदी आदेश लागू : अनंत चतुर्दशी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय  


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात अनंत चतुर्दशी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एकूण ७५९ सार्वजनिक गणेशोत्सवांची स्थापना करण्यात आली असून, १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विसर्जन सोहळे पार पडणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, सण व उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजल्यापासून २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगणे, विनापरवाना जमाव जमविणे, मिरवणुका काढणे तसेच घोषणाबाजी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सणांच्या काळात जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच, या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर प्रचलित फौजदारी कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





  Print






Related Photos