महत्वाच्या बातम्या

 ६ स्तरांची थरारक रचना : ३० फूट उंच दहीहंडी फोडत जय शितलामाता मंडळाची सलामी


- कमल स्पोर्टींग क्लबच्या विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठच्या गोविंदांचा डंका , १ लाखांचे पारितोषिक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूरच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठ येथील जय शितलामाता मंडळाने तब्बल ६ स्तरांची मानवी मनोरा रचना करून ३० फूट उंचीवरील दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. या थरारक कामगिरीने उपस्थित हजारो प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. विठ्ठल मंदिर वॉर्डातील विठ्ठल व्यायामशाळेच्या भव्य पटांगणावर रविवार, ६ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. जय शितलामाता मंडळाच्या विजयी गोविंदांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व १ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसराज अहीर होते. आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, डॉ. अशोक जिवतोडे, खुशाल बोंडे, महापौर संगिता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्ष मनस्वी गिऱ्हे, नगराध्यक्ष निलेश ताजणे, प्रकाश देवतळे, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लहान बालकांनी श्रीकृष्णाच्या वेशभूषेत कृष्णाच्या जीवनावर आधारित मनमोहक नृत्य सादर केले. तसेच पुष्पा अ‍ॅक्टचे सादरीकरण करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. प्रास्ताविकात रघुवीर अहीर यांनी दहीहंडी उत्सवामागील कमल स्पोर्टींग क्लबची भूमिका स्पष्ट केली. दहीहंडीची परंपरा, पावित्र्य आणि भगवान श्रीकृष्णाशी असलेले भावनिक नाते प्रत्येकाने जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार करण देवतळे यांनी जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे सनातन संस्कृतीतील महत्त्व विशद केले. स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करत त्यांनी सहभागी गोविंदा पथकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत विविध मंडळांच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. मात्र, जय शितलामाता मंडळाने ६ स्तर उभारत ३० फूट उंच दहीहंडी फोडत बाजी मारली. त्यांच्या या कामगिरीने मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल गायकवाड, मयुर झाडे, विपीन मेंढे, जितेश वासेकर, जगदिश दंडेले, आशय चंदनखेडे, राजेश खनके, अभिजीत आकोजवार, अमोल माळवे, मयूर भोकरे, राहुल सूर्यवंशी, ईश्वर वाघमारे, सुबोध चिकटे यांच्यासह कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन राहुल बनकर व ऋतुजा नागापूरे यांनी केले.





  Print






Related Photos