चारचाकीच्या धडकेत ३३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू


- कान्होबा सणासाठी स्वगावी परतताना काळाचा घाला; एकुलत्या कमावत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : कान्होबा सणानिमित्त स्वगावी मोहदुरा येथे दुचाकीने परतत असलेल्या ३३ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष सुधाकर बांते असे मृत तरुणाचे नाव आहे. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास लाखनीनजीकच्या गडेगाव परिसरात घडला.
संतोष बांते हा कामानिमित्त बाहेरगावी राहत होता. कान्होबा सणासाठी कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो दुचाकीने आपल्या मोहदुरा या स्वगावी परतत होता. लाखनीहून भंडाराच्या दिशेने येत असताना गडेगाव परिसरात त्याची दुचाकी आली. याचवेळी एमएच ३६ एएल ३६०५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की संतोष गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संतोषचा मृत्यू झाला होता.
सणासाठी घराकडे निघाला, मात्र नियतीने हिरावले -
संतोष हा कामानिमित्त बाहेरगावी राहत असल्याने कान्होबा सणानिमित्त आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तो स्वगावी निघाला होता. सणाच्या दिवशी घरातील आपला मुलगा परतणार असल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गडेगाव परिसरात झालेल्या अपघाताने या आनंदावर क्षणात दुःखाचे सावट पसरले.
एकुलत्या कमावत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंब हादरले -
संतोष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो कुटुंबातील कमावता आधार असल्याने त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. सणासाठी घरी परतत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने आई-वडिलांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मोहदुरा गावात शोककळा पसरली असून, सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या अपघाताने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
लाखनी पोलिसांकडून तपास सुरू -
या घटनेची नोंद लाखनी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, चारचाकी वाहनाची दिशा व वेग तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.




Petrol Price




