महत्वाच्या बातम्या

 पोर्ला वनपरिक्षेत्रात आक्रमक टस्कर हत्ती बेपत्ता : तीन ते चार दिवसांपासून वन विभागाला लोकेशन मिळेना!


- कळपापासून विभक्त झालेल्या टस्करचा ठावठिकाणा नाही; शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, तातडीने शोधमोहीम राबविण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गेल्या आठवडाभरापासून पोर्ला वनपरिक्षेत्रातील गावांच्या शिवारात धुमाकूळ घालणारा आक्रमक टस्कर हत्ती सध्या बेपत्ता झाला असून, मागील तीन ते चार दिवसांपासून वन विभागाला त्याचे नेमके लोकेशन मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. हत्तींचा कळप चुरचुराच्या जंगलात ठाण मांडून असताना कळपापासून विभक्त झालेला हा टस्कर नेमका कुठे गेला, याचा थांगपत्ता लागत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्यापासून हा टस्कर पोर्ला वनपरिक्षेत्रातील विविध गावांच्या शिवारात संचार करीत होता. अत्यंत आक्रमक स्वभावाच्या या हत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण आहे. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून वन विभागाला त्याच्या हालचालींचा मागोवा घेता आलेला नाही. तांत्रिक अडचणी किंवा देखरेखीच्या अभावामुळे त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडथळे येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

दरम्यान, हत्तीच्या हालचालींवर वन विभागाचे पथक प्रभावीपणे लक्ष ठेवत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. सध्या परिसरात शेतीच्या कामांची लगबग सुरू असून, शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने शेतशिवारात जात आहेत. अशा परिस्थितीत बेपत्ता टस्कर अचानक शेतशिवारात किंवा गावालगत आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

तातडीने शोधमोहीम राबविण्याची मागणी -
वन विभागाने या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने विशेष शोधमोहीम राबवून टस्कर हत्तीचे लोकेशन शोधावे, त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि संभाव्य धोक्याबाबत परिसरातील गावकऱ्यांना सतर्क करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

कळपापासून विभक्त झालेला एकटा टस्कर अधिक आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेता त्याचा तातडीने शोध घेणे आवश्यक बनले आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बेपत्ता टस्करचा शोध घेण्यासाठी वन विभाग कोणती पावले उचलतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos