सहा वर्षांपासून आलापल्ली–सिरोंचा महामार्गाचे काम रखडले : दीड वर्षापासून धुळीचा त्रास!


- जुलैमध्ये अधीक्षक अभियंत्यांची पाहणी, सप्टेंबरमध्ये पुन्हा वृत्ताद्वारे प्रशासनाला स्मरण; नोव्हेंबरमध्येही परिस्थिती जैसे थे - संतोष ताटीकोंडावार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे कारवाईची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दक्षिण गडचिरोली जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीच्या बांधकामाचा प्रश्न अद्याप कायम असून, गेल्या सहा वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले आहे. मागील दीड वर्षापासून नागरिकांना धूळ, खड्डे आणि अपूर्ण रस्त्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विशेष म्हणजे, जुलै २०२६ मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी या महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. मात्र, महामार्गाची दुरवस्था इतकी गंभीर होती की, त्यांनाही चंद्रपूर–राजुरा–मंचेरियल (तेलंगणा) मार्गे वळसा घालून सिरोंचा गाठावे लागले होते. या परिस्थितीवर प्रकाश टाकणारे वृत्त दैनिक नवराष्ट्र मध्ये २५ जुलै २०२६ रोजी तेलंगणामार्गे प्रवासाची नामुष्की या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते.
त्यानंतरही महामार्गाच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने २१ सप्टेंबर २०२६ रोजी दैनिक नवराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा या समस्येचा संदर्भ देत वृत्त प्रकाशित करण्यात आले. या माध्यमातून प्रशासनाला महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जुलै महिन्यातील पाहणी, सप्टेंबरमधील वृत्त आणि त्यानंतरचा पाठपुरावा करूनही २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत महामार्गाची परिस्थिती कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पुलांची बांधकामे अपूर्ण असून, रस्त्यावरील धुळीमुळे वाहनचालक, प्रवासी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाहणीनंतर कंत्राटदारावर कोणती कारवाई झाली?
अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी जुलै महिन्यात पाहणी केल्यानंतर संबंधित वशिष्ठ कन्स्ट्रक्शन कंपनीवर नेमकी कोणती कारवाई केली? कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे का? तसेच कंत्राटदाराला करण्यात आलेल्या आर्थिक देयकांची आणि कामाच्या प्रगतीची तपासणी झाली आहे का? असे प्रश्न संतोष ताटीकोंडावार यांनी उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कंत्राटदाराच्या कामावर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे का, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागलेल्या महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची अवस्था किती बिकट असेल, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी -
या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. अधीक्षक अभियंता विवेक नवले यांच्या कार्यप्रणालीची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, जुलै महिन्यातील पाहणी अहवाल आणि त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक करावा, तसेच कंत्राटदाराला देण्यात आलेल्या मुदतवाढीची आणि आर्थिक देयकांची सखोल तपासणी करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
चौकशीत कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी. यासोबतच महामार्गावरील धुळीचे साम्राज्य तातडीने थांबवून पुलांसह रखडलेली सर्व कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा -
२५ जुलै रोजी वृत्तपत्रातून महामार्गाची वस्तुस्थिती समोर आणण्यात आली, २१ सप्टेंबर रोजी पुन्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले; मात्र २५ नोव्हेंबर उजाडूनही नागरिकांच्या वाट्याला धूळ, खड्डे आणि अपूर्ण महामार्गच येत असल्याची खंत संतोष ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली.
आम्ही शासनाकडे भीक मागत नाही, तर जनतेच्या कराच्या पैशातून निर्माण होणारा आमच्या हक्काचा सुरक्षित महामार्ग मागत आहोत. दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या त्रासाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने दखल घेऊन स्वतः लक्ष घालावे आणि जनतेला न्याय द्यावा. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग विभागाची अधिकृत भूमिका आणि संबंधित कंत्राटदाराकडून काम रखडण्यामागील कारणे समोर येणेही महत्त्वाचे ठरणार आहे. दक्षिण गडचिरोलीच्या दळणवळण आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या महामार्गाचे काम आता तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




Petrol Price




