महत्वाच्या बातम्या

 रब्बी हंगामात पिकांचे व पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :  यंदाच्या पर्जन्यमानातील घट आणि अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, रब्बी हंगामातील पिक नियोजन करताना शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करावा तसेच उपलब्ध पाण्याचा साठा, जमिनीचा प्रकार आणि स्थानिक हवामानाचा विचार करूनच पिकांची पेरणी करावी, असे आवाहन नागपूरच्या तालुका कृषी अधिकारी रमा बनकर यांनी केले आहे.


रब्बी हंगामात पिकांची निवड करताना शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या तसेच कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावे. गहू पिकाला अधिक पाण्याची गरज असून यांसारख्या पिकांचे क्षेत्र उपलब्ध पाण्यानुसारच निश्चित करावे. हरभरा, करडई, जवस, तीळ, ज्वारी, बाजरी, मका व सूर्यफूल यांसारख्या कमी पाण्यात घेता येणाऱ्या पिकांचा विचार करावा. चिया आणि जनावरांसाठी चारा पिकांचे नियोजन करताना कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.


पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी -
पेरणीपूर्वी शेतातील उपलब्ध ओलावा व बोअरवेलमधील पाणीसाठा तसेच सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य मूल्यमापन करावे. उपलब्ध पाण्याच्या प्रमाणानुसार पेरणीखालील क्षेत्र निश्चित करावे. मोठ्या क्षेत्रावर जास्त पाणी लागणारी पिके घेणे टाळावे. हरभरा, करडई, जवस या कमी पाण्याच्या पिकांना प्राधान्य द्यावे. संत्रा पिकामध्ये आच्छादनाचा वापर करावा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि इतर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा शक्य तिथे वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत, कोळपणी व तणनियंत्रण यांसारख्या उपाययोजना कराव्यात.


 रब्बी ज्वारीबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन -
विदर्भामध्ये रब्बी हंगामात ज्वारी हे अत्यंत महत्त्वाचे पीक असून, यामुळे अन्धा न्याबरोबरच जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक सुका कडबा (चारा) मिळतो. विदर्भासाठी शिफारस केलेले प्रमुख वाण पिकेव्ही क्रांती (AKSV-१३), ताकपा-५ (TAKPS-५), ट्रॉबे अकोला सुरुची, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१ आणि परभणी शक्ती हे आहेत. रब्बी ज्वारीच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर अर्ज सादर करावे. हवामानातील बदल आणि संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून आर्थिक जोखीम कमी करणारे पिकांचे नियोजन करावे व कृषी विभागाचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन  नागपूरच्या तालुका कृषी अधिकारी बनकर यांनी केले आहे.





  Print






Related Photos