अपघातग्रस्तांना तत्काळ मदत : रुग्णवाहिकेने तीन जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल


- नागरिकांची तत्परता आणि रुग्णवाहिका चालकाची कार्यक्षमता कौतुकास्पद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावर रविवारी सकाळी चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवक जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि रुग्णवाहिका चालकाने तातडीने प्रतिसाद दिल्याने तिन्ही जखमींना अवघ्या काही वेळात आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमींवर तातडीने उपचार सुरू करता आले. आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावर रविवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ठाणेगाव येथील रंजीत मोंगारकार, अंकित सुभाष मडावी आणि प्रफुल नैताम हे तिघे युवक जखमी झाले.
अपघाताची घटना घडल्यानंतर त्याच मार्गाने नागपूरकडे जात असलेले संजय ठेंगरी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नंदू नाकतोडे यांनी कोणताही विलंब न करता आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक विलास मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती करण्यात आली.
नंदू नाकतोडे यांनी स्वतःही रुग्णालय गाठून पोलिस यंत्रणेला तसेच जखमींच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, रुग्णवाहिका चालक विलास मेश्राम यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ घटनास्थळ गाठले. अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि तिन्ही जखमींना सुरक्षितपणे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील दोघांना गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले, अशी माहिती आहे. अपघातानंतर काही मिनिटांतच जखमींना रुग्णालयात पोहोचविल्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत झाली.
प्रसंगावधानामुळे मिळाली वेळेत मदत -
अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदतीसाठी पुढाकार घेतला. संजय ठेंगरी यांनी घटनेची माहिती तत्काळ पुढे पोहोचविल्याने रुग्णवाहिका सेवेला वेळीच पाचारण करता आले. त्यानंतर चालक विलास मेश्राम यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांचे प्रसंगावधान आणि रुग्णवाहिका चालकाची तत्परता महत्त्वाची ठरली. अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संजय ठेंगरी आणि रुग्णवाहिका चालक विलास मेश्राम यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. संकटकाळात नागरिकांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
आपत्कालीन प्रसंगी तत्काळ माहिती द्या -
दरम्यान, अपघात किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी वेळ न दवडता तत्काळ जवळचे पोलिस ठाणे, रुग्णवाहिका सेवा किंवा एक हात मदतीचा या सामाजिक संस्थेला माहिती द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे यांनी केले आहे. संकटकाळात मदतीसाठी केलेली काही मिनिटांची तत्परता एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्यास नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.




Petrol Price




