चंद्रपुरात घरातून १९.२२० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त : पोलिसांना धमकी देत तरुणाने स्वतःला केले जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील आनंदनगर, महाकाली कॉलरी परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना एका तरुणाने आत्महत्येची धमकी देत स्वतःच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता १९.२२० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी ४२ हजार २८४ रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपी शुभम संजय वासेकर २४ वर्षे आणि संजय महादेव वासेकर ५२ वर्षे दोघेही रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, आरोपी शुभम हा आपल्या घरी एमडी ड्रग्ज बाळगून त्याची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर परवानगी घेऊन घराची झडती घेण्याची तयारी केली.
पोलिसांचे पथक घरी पोहोचले असता आरोपी शुभम आणि त्याचे वडील संजय वासेकर हे दोघे बाहेर आले. पोलिसांनी झडतीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असता शुभमने झडती घेण्यास विरोध केला. तसेच स्वतःला जखमी करून जीव देण्याची धमकी दिली. त्यानंतर घरात पळून जाऊन धारदार वस्तूने स्वतःच्या गळ्याभोवती वार करून घेतला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले.
यानंतर पोलिसांनी संजय वासेकर यांच्या संमतीने घराची झडती घेतली. घरातील बेडवरील गादीखाली एका प्लास्टिक पिशवीत पाच छोट्या पिशव्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळली. ही पावडर एमडी ड्रग्ज असल्याचे संजय वासेकर यांनी सांगितले. आपण आणि आपला मुलगा मिळून या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची कबुलीही त्यांनी दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. वजन केले असता त्याचे निव्वळ वजन १९.२२० ग्रॅम भरले. हा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केला.
सदर कारवाई चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे -
पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोहवा संजय धोटे, संतोष दंडेवार, पोअं कपुरचंद खरवार, खंडेराव माने, प्रशांत कुसरे, निलेश ढोक, विक्रम, योगेश पिदुरकर आणि लीना यांनी केले. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.




Petrol Price




