पोंभुर्ण्यात ठाकरे गटाचे ऑपरेशन यशस्वी : शिंदेसेनेतील दोन पदाधिकारी गळाला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी घडामोड समोर आली आहे. शिंदेसेनेचे युवासेना तालुका प्रमुख रजत ढोंगे आणि शिवसेना तालुका संघटक सचिन मडावी यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. विशेषतः आगामी नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेतील पदाधिकाऱ्यांचा हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर तसेच शिवसेनेच्या मूळ विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत रजत ढोंगे, सचिन मडावी आणि त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी सांगितले की, ढोंगे आणि मडावी यांच्या प्रवेशामुळे पोंभुर्णा परिसरातील संघटनेला बळ मिळाले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यात येणार असून, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष उभारला जाईल. पोंभुर्णा परिसरात पक्षाची ताकद वाढवून आगामी निवडणुकीत सक्षमपणे मैदानात उतरण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल, शिवसेना महानगर प्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, युवासेना चंद्रपूर शहरप्रमुख फर्दीन सय्यद, युवासेना बल्लारपूर समन्वयक सोहेल नवशद खान, युवासेना चंद्रपूर उपतालुका प्रमुख विवान रामटेके, युवासेना पोंभुर्णा शहरप्रमुख नोकेश कपाट, उपशहरप्रमुख सुरज कावळे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोंभुर्ण्यात झालेल्या या पक्षबदलामुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेतील दोन पदाधिकाऱ्यांनी समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत याचा परिणाम कितपत जाणवतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




