महत्वाच्या बातम्या

 सर्वायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानात आता वर्धा जिल्ह्याचाही समावेश


- जीविका फाउंडेशनच्या साथीने २५ हजाराहून अधिक मुलींना मिळणार मोफत लस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार वेगाने सुरू आहे. पुणे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर जिल्ह्यानंतर आता वर्धा जिल्ह्याचाही या राज्यव्यापी अभियानात अधिकृत समावेश करण्यात आला आहे.

भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. दर ८ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत असून दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे वेळेवर तपासणी आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहोत. आपल्या मुलींचे संरक्षण करणे हे आपले नैतिक आणि सामाजिक दायित्व आहे. कॉर्पोरेट घटकांनी सीएसआरच्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढ्याला बळ द्यावे.

या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये जीविका फाउंडेशन (जीविका हेल्थकेअर) राज्याचा अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करत आहे. शासनासोबत समन्वय साधून जनजागृती, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी जीविका फाउंडेशन सक्रियपणे कार्यरत आहे. जीविका फाउंडेशन या मोहिमेअंतर्गत १५ ते २० वयोगटातील मुलींना मोफत लस देऊन त्यांना सुरक्षा कवच प्रदान करणार आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कारंजा या आकांक्षित तालुक्यापासून लसीकरणाची सुरुवात होईल आणि त्यानंतर आर्वी व वर्धा तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. या पहिल्या टप्प्यात सुमारे ५,००० लाभार्थी मुलींना लस दिली जाईल. तर, दुसऱ्या टप्प्यात या तीनही तालुक्यांत १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी २०,००० पेक्षा जास्त पात्र मुलींचे लसीकरण केले जाणार असून, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात या मोहिमेचा विस्तार केला जाईल.

या राज्यव्यापी मोहिमेला गती देण्यासाठी जीविका फाउंडेशनचे अध्यक्ष जिग्नेश पटेल यांच्यासोबतची भागीदारी करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण भागीदारीबद्दल बोलताना जिग्नेश पटेल म्हणाले, महाराष्ट्र शासनासोबत सार्वजनिक आरोग्य अभियानाचा भाग होण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रत्येक पात्र मुलीपर्यंत सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पोहोचावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील तरुण मुलींचे भविष्य सुरक्षित आणि निरोगी करण्यासाठी टाकलेले हे पाऊल सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.





  Print






Related Photos