महत्वाच्या बातम्या

 वसतिगृह प्रवेशासह आधार व स्वयंम योजनांसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा


- ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वसतिगृह प्रवेश, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे. व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा व आवश्यक सहाय्य मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेंतर्गत वसतिगृह प्रवेशासाठी तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेच्या अटी व पात्रता तपासून विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित मुदतीत सादर करावा.

विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर करण्याची संधी मिळेलच, असे नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा -
योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती-भटक्या जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, गडचिरोली येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. हे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, गडचिरोली यांनी केले आहे.

महत्त्वाची सूचना : पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनांसाठी ३० ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करून उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा.





  Print






Related Photos