महत्वाच्या बातम्या

 बाल सेविका बनुया, अंगणवाडी ताईचे काम जाणून घेऊया


- सेवा संकल्प अभियानांतर्गत रंगला अनोखा उपक्रम

- छोट्या छोट्या ‘बाल सेविकांनी’ सांभाळली अंगणवाडी

- अनुभवातून नेतृत्व, जबाबदारी आणि सेवाभावाचे धडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : बालकांच्या सर्वांगीण विकासाला आनंददायी अनुभवाची जोड देत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बाल सेविका बनुया, अंगणवाडी ताईचे काम जाणून घेऊया हा अनोखा व अभिनव उपक्रम राबविण्यात आला. छोट्या बालसेविकांनी आपली अंगणवाडी सांभाळली. यातून त्यांना नेतृत्व, जबाबदारी आणि सेवाभावाचे धडे प्राप्त झाले.

एक दिवस अंगणवाडी सेविका बनून पाहूया आणि अंगणवाडी ताईचे काम जाणून घेऊया या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात छोट्या छोट्या बालकांनी प्रत्यक्ष बाल सेविकाची भूमिका साकारत अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजाचा अनुभव घेतला. बाल सेविकांच्या भूमिकेत बालकांनी त्यांच्या वयोगटानुसार विविध कृतींमध्ये सहभाग घेतला. खेळातून शिकविणे, बालकांची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, पूरक आहाराची माहिती घेणे, आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती, पालक व समुदायाशी संवाद साधणे अशा विविध कृतींमधून बालकांनी अंगणवाडी सेविकेच्या कार्याची जवळून ओळख करून घेतली.

अंगणवाडीतील दैनंदिन कामकाज, बालकांचे पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे, याची जाणीव बालकांना प्रत्यक्ष कृतीतून झाली.

छोट्या बाल सेविकांनी घेतली मोठी जबाबदारी -

या उपक्रमात बालकांनी एकमेकांना मदत करणे, समूहामध्ये काम करणे, इतरांची काळजी घेणे आणि दिलेली जबाबदारी पूर्ण करणे याचा अनुभव घेतला. मी ही करू शकतो, शकते हा आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच नेतृत्व, सहकार्य, संवेदनशीलता आणि सेवाभाव या मूल्यांची रुजवण या उपक्रमातून करण्यात आली.

अंगणवाडीपासून नेतृत्वाची पहिली पायरी -

अंगणवाडी केंद्र हे केवळ पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण देणारे केंद्र नसून, बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सामाजिक जाणीव घडविण्याची पहिली शाळा आहे. या अभिनव उपक्रमातून जबाबदारी स्वीकारण्याची, नेतृत्व करण्याची आणि इतरांची काळजी घेण्याची भावना बालमनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

 





  Print






Related Photos