दीक्षाभूमीच्या पावित्र्यासाठी आंबेडकरी समाजाचा एल्गार : १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमीचे संवर्धन, सुयोग्य विकास आणि तिचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुण-तरुणी आणि समाजबांधवांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिक डोर्लीकर यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
दीक्षाभूमीतील ऐतिहासिक बुद्ध विहार पाडण्याऐवजी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे नूतनीकरण करावे, अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता परिसरात इतर नवीन बांधकामांना प्रतिबंध घालण्यात यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीमध्ये एकाच परिवारातील संबंधित सदस्यांचा समावेश न करता समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. तसेच दीक्षाभूमी परिसरात तातडीने स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
दीक्षाभूमीच्या पावित्र्याला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये, यासाठी परिसरात व्यावसायिक स्टॉल्स तसेच राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व आणि पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दीक्षाभूमीच्या संवर्धनासाठी आणि तिचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आयोजित या आक्रोश मोर्चात बौद्ध-आंबेडकरी समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन, चंद्रपूर आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केले आहे. पत्रपरिषदेला अशोक टेंभरे, मृणाल कांबळे, हर्षल खोब्रागडे, गीता रामटेके, विजय करमरकर, लुंबिनी गणवीर आदी उपस्थित होते.




Petrol Price




