मरणानंतरही हेळसांड थांबेना : सालईटोल्यात मृतदेह बांबूला टांगून चिखलातून दीड-दोन किलोमीटर पायपीट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न किती गंभीर आहे, याचे संतापजनक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. धानोरा तालुक्यातील चुडियाल ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सालईटोला गावात एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्वगावी नेण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांना चक्क खाटेला दोरीने बांधून, दोन बांबूंच्या सहाय्याने खांद्यावर उचलत चिखल-पाण्यातून सुमारे दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.
१३ सप्टेंबर रोजी घडलेला हा प्रकार १४ सप्टेंबर रोजी समोर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा चर्चेत आली आहे. जिवंतपणी रुग्णांना उपचारासाठी खाटेची कावड करून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते; आता मृत्यूनंतरही मृतदेहाला सन्मानाने अंत्यसंस्कारस्थळी नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
उपचारानंतर भावाकडे मुक्काम -
धानोरा तालुक्यातील फाशीटोला येथील अंतराम तुलावी ५५ वर्ष यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, फाशीटोला येथे परत जाण्याऐवजी ते सालईटोला येथील आपल्या भावाकडे मुक्कामी होते.दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. उपचार मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. तुलावी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह फाशीटोला या त्यांच्या स्वगावी नेण्याची तयारी करण्यात आली.
पक्का रस्ता नसल्याने मृतदेहाची कावड -
सालईटोला गावाला अद्याप पक्का रस्ता नसल्याने मृतदेह गावातून थेट वाहनापर्यंत नेणे अशक्य होते. धानोरा महामार्गावरील मुरुमगावपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटरचे अंतर शेतरस्त्याने पार करावे लागते. पावसामुळे या मार्गावर चिखल आणि पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
अशा परिस्थितीत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह खाटेवर ठेवून तो दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधला. त्यानंतर खाटेला दोन बांबूंचा आधार देत ती खांद्यावर उचलण्यात आली. चिखल-पाण्यातून वाट काढत ग्रामस्थांनी दीड ते दोन किलोमीटरची अवघड पायपीट केली. मोठ्या कष्टाने मृतदेह मुरुमगावजवळ मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आला. त्यानंतर वाहनाच्या सहाय्याने मृतदेह फाशीटोला येथे नेण्यात आला. तेथे सायंकाळी अंतराम तुलावी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मरणानंतरही सन्मानाची वाट खडतर -
मृत व्यक्तीला शेवटचा निरोप देतानाही कुटुंबीय आणि ग्रामस्थांना अशा प्रकारे संघर्ष करावा लागणे ही केवळ एका कुटुंबाची समस्या नसून दुर्गम भागातील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था अधोरेखित करणारी बाब आहे. गावात रस्ता नसल्यामुळे आजारी व्यक्तीला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण होते. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर होते.रस्त्याअभावी वाहन गावापर्यंत पोहोचत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना स्वतच्या जीवाची पर्वा न करता रुग्ण किंवा मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे सालईटोल्यातील या घटनेने प्रशासनाच्या ग्रामीण विकासाच्या दाव्यांसमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे.
निवेदने देऊन ग्रामस्थ थकले -
सालईटोला गावाला पक्का रस्ता मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच संबंधित लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागण्या करण्यात आल्या. याशिवाय रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदनेही देण्यात आली. मात्र, वर्षे उलटून गेल्यानंतरही रस्त्याचा प्रश्न जैसे थेच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात एखादा नागरिक आजारी पडला की त्याला मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात शेतरस्ता चिखलमय झाल्याने ही अडचण आणखी वाढते. आता मृत्यूनंतरही मृतदेहाला त्याच चिखलमय रस्त्यावरून खांद्यावर वाहून न्यावे लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सरकार आमचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का -
गावात कुणी आजारी पडले किंवा दगावले, तर आम्हाला जीव मुठीत धरून शेतरस्त्यातून प्रवास करावा लागतो. पक्क्या रस्त्यासाठी अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि लोकप्रतिनिधींकडे निवेदने दिली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सरकार आणि प्रशासन आमचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सालईटोल्यातील या घटनेनंतर तरी प्रशासन आणि ग्रामपंचायत जागी होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरिकांना जिवंतपणी उपचारासाठी आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही रस्ता मिळत नसेल, तर विकासाचा नेमका लाभ दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मृतदेहाला रस्ता मिळण्यासाठी आणखी किती मृत्यूंची प्रतीक्षा -
सालईटोल्यातील या घटनेने केवळ रस्त्याचा प्रश्न समोर आणलेला नाही, तर दुर्गम भागातील नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रुग्णवाहिका, चारचाकी वाहन किंवा इतर आपत्कालीन सेवा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसणे ही गंभीर बाब आहे.
मृतदेहाला सन्मानाने गावाबाहेर नेण्यासाठीही ग्रामस्थांना बांबूची कावड करावी लागत असेल, तर प्रशासनाने आता तरी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. मृतदेहाला रस्ता मिळण्यासाठी आणखी किती मृत्यूंची वाट पाहावी लागणार? हा सवाल सालईटोल्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या गंभीर प्रकाराबाबत धानोरा तहसीलदार गणेश माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.




Petrol Price




