एटापल्ली तालुक्यात नऊ शिक्षक शालेय वेळेत गैरहजर : कारणे दाखवा नोटिसीनंतरही खुलासा नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (गडचिरोली) : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर असतानाच एटापल्ली तालुक्यात शिक्षण विभागाच्या तपासणीत शिक्षकांच्या अनधिकृत गैरहजेरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांनी शाळांना दिलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान कसनसूर आणि कोटमी केंद्रांतर्गत तब्बल नऊ शिक्षक शालेय वेळेत गैरहजर आढळून आले.
गैरहजर आढळलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच, तीन दिवसांच्या आत गैरहजेरीबाबतचा खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, रविवारी तीन दिवसांची मुदत संपूनही संबंधित शिक्षकांकडून खुलासा प्राप्त झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संबंधित शिक्षकांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
प्रत्यक्ष तपासणीत गैरहजेरी उघड -
गटशिक्षणाधिकारी बुरडकर यांनी कसनसूर व कोटमी केंद्रांतर्गत विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शालेय कामकाजाची पाहणी केली. यावेळी शाळेच्या वेळेत नऊ शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची नियमित उपस्थिती आणि विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण शिक्षण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असताना शिक्षकच अनुपस्थित असल्याने शिक्षण विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
गैरहजर आढळलेले शिक्षक -
तपासणीदरम्यान गैरहजर आढळलेल्या शिक्षकांमध्ये प्रकाश मडावी (कसनसूर), साईनाथ तिमाडे (गडेरी), प्रकाश मोहुर्ले (आसांवडी), वसंत गव्हारे (झुरी), पीतांबर चापले (नैनगुडा), कृष्णानाथ बडा (हालेवारा), दीपक मंडल (वेनासर), महादेव दुर्गे (कोटमी) आणि रेखचंद वाळके (कोईदुळ) यांचा समावेश आहे.
खुलासा न आल्याने कारवाईकडे लक्ष -
संबंधित शिक्षकांना तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही खुलासा प्राप्त झाला नसल्याने शिक्षण विभागाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संबंधित शिक्षकांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून गैरहजेरीचे कारण आणि त्यामागील परिस्थिती तपासली जाणार आहे.
दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई -
याबाबत गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांनी सांगितले की, शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. संबंधित शिक्षकांचे खुलासे तपासल्यानंतर दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. तसेच, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते की नाही, यासाठी अशा शाळांना स्वतः भेटी देऊन तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांची नियमित उपस्थिती अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईबरोबरच दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीवर शिक्षण विभागाकडून अधिक काटेकोरपणे लक्ष दिले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




