शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करणेबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
ज्या महापालिकेत शाळा सुरू करणे शक्य आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील. शहरी भागात करोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असतील, तर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठीत केली जाणार आहे. तसेच, नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत होणार आहे.
शिक्षण विभागाकडून याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,  कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झालेला असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे ब्रेक दि चेन अंतर्गत नव्या मार्गदर्शक सचूना आदेश २ ऑगस्ट नुसार काही जिल्ह्यांमध्ये कोविड काळातील निर्बंधांसंबंधी निर्णय़ाबाबत संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना व इतर जिल्हयांमध्ये शाळांसंबंधी निर्णयाबाबत शालेय शिक्षण विभागास अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हाव यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये शाळांचे वर्ग सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यापूर्वी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ७ जुलै २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार कोविडमुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर, ब्रेक दि चेन सुधारित मार्गदर्शक सूचना विचारात घेता कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुषंगाने १७ ऑगस्ट पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, २ ऑगस्ट २०१२१ च्या ब्रेक द चेन मधील सुधारित मार्गदर्शक सचूनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय़ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-08-10
Related Photos