आरमोरी-वैरागड मार्गावर क्रूरपणे केली जाणारी अवैध गोवंश वाहतूक उघडकीस : ९.८० लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक


- दोन पिकअप वाहनांमधून ६ बैलांची सुटका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम राबवत गुरुवारी २० ऑगस्ट दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत क्रूरपणे आणि बेकायदेशीरपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या ६ गोवंश बैलांची सुटका करण्यात आली असून तीन संशयित आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही घटनांमध्ये महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पहिली कारवाई आरमोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौजा रामाळा ते वैरागड रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरावर करण्यात आली. पोलीस शिपाही रत्नदिप ताराचंद जगझापे ४१ वर्षे हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना संशयित महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्र. MH-29 BE-6778 येताना दिसले. पोलिसांनी सदर वाहन थांबवून पाहणी केली असता, वाहनात २ मोठे पांढऱ्या रंगाचे व १ लाल-काळसर रंगाचा असे एकूण ३ बैल अत्यंत अपुऱ्या जागेत दाटीवाटीने कोंबून, घट्ट दोराने बांधून ठेवल्याचे आढळले.
जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता व कसलाही परवाना नसताना निर्दयतेने त्यांची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी वाहनातील चालक अजय नामदेव मेश्राम २७ वर्षे रा. गांगलवाडी, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर आणि त्याचा साथीदार ज्ञानदिप लोमेश वालदे २५ वर्षे रा. मुई, ता. ब्रह्मपुरी या दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत ९० हजार रुपये किमतीचे ३ बैल आणि ४ लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार दिनकर मेश्राम पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, दुसरी कारवाई जोगीसाखरा ते वैरागड मार्गावर १५ किलोमीटर अंतरावर सायंकाळी ७.४० ते रात्री ८.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलीस हवालदार लक्ष्मन बळीराम नैताम ४७ वर्षे हे गस्तीवर असताना त्यांनी दुसऱ्या महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप वाहनाला क्र. MH-37 J-1897 थांबवले. या वाहनाची झडती घेतली असता त्यात २ मोठे लाल रंगाचे व १ पांढऱ्या रंगाचा असे एकूण ३ गोवंश बैल अत्यंत अमानुषपणे कोंबून वाहतूक करताना मिळून आले. या कारवाईत आरोपी रेवनदास झिंगर ठाकरे ४१ वर्षे रा. सोंदरी, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर याला जागीच पकडण्यात आले. या प्रकरणातही ९० हजार रुपयांचे ३ बैल आणि ४ लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार चंपा कामतकर करत आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये मिळून पोलिसांनी एकूण ६ मुक्या जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले
आहे. तसेच दोन्ही घटनांतील तीनही आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११ (१) (ड) व (ङ) अन्वये आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरमोरी पोलिसांनी राबवलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.




Petrol Price




