दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गीतांनी दुमदुमला परिसर
- आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांनी सादर केली भीमगीते
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रसिध्द पार्श्वगायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली माडे यांनी भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर झालेल्या कार्यक्रमात भीमगीतांच्या आवाजाने परिसर दुमदुमला.
राहुल तायडे यांच्या वंदन गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. यानंतर त्यांनी ना तोफ की जरुरत...ना बंब की जरुरत....धरती को तो सिर्फ बुध्द गौतम की जरुरत हे गीत सादर केले. यानंतर गायिका वैशाली माडे यांनी अमृतवाणी ही बुध्दाची एैक देऊनी ध्यान.....साधण्या या जन्मी निर्वाण या गीताने सुरवात करून या माझ्या दलित बांधवांनो...रंजल्या आणि गांजल्यांनो....देईल तुम्हाला करून मी खुले....काळाराम मंदीर, चवदारचे तळे’ हे गीत सादर करताच प्रक्षेकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यानंतर त्यांनी माझ्या भीमाच्या नावाचं कुंकु लाविलं रमान हे गीत सादर केले.
पार्श्वगायक आनंद शिंदे यांनी फुले, कबीर, शाहू इनका नाम लेता हु या गीताने सुरवात केली. यानंतर तु इतकं दिलं आम्हाला, हे कधी सरावं....तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं आणि कायदा भीमाचा.....किती शोभला असता भीम माझा टाय आणि कोटावर हे गीत सादर करताच नागरिकांनी वन्स मोर, वन्स मोर ची मागणी केली.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद शिंदे यांचे या पवित्र भुमीत स्वागत करून त्यांना भेटवस्तू दिली. तसेच आनंद शिंदे यांचा भारदस्त आवाज, त्यांची शैली, शब्दरचना याला माझा सलाम, असे म्हणून पालकमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्वार काढले. तत्पूर्वी डॉ. राहुल घोटेकर यांनी वैशाली माडे यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाला सुधाकर भालेराव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी श्रीराम पांडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ब्रिजभुषण पाझारे, राहुल पावडे यांच्यासह दीक्षाभुमिवर मोठ्या संख्येने बौध्द बांधव उपस्थित होते.
News - Chandrapur