महत्वाच्या बातम्या

 फेब्रुवारी पर्यंत चारा टंचाईची शक्यता, आतापासूनच कायमस्वरूपी उपाययोजना करा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


- चारा लागवड, वैरण बियाणे वाटप व साठवणुकीचे नियोजन करण्याचे आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यात सध्या पशुधनासाठी सुमारे २६० ते २७० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. मात्र, आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता फेब्रुवारीपर्यंतची गरज पूर्ण करण्यासाठी आतापासूनच चारा लागवडीसह कायमस्वरूपी उपाययोजना हाती घ्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित चारा टंचाईविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त नितीन फुके उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी सहभागी झाले होते.

चारा लागवडीसाठी जमिनींची माहिती संकलित करा -
चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित विभागांनी निश्चित केलेल्या नियोजनानुसार तातडीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डिसेंबरअखेरपर्यंत उपलब्ध होणाऱ्या गाळपेर क्षेत्राची गावनिहाय माहिती तसेच तलावांतील क्षेत्राची एकरनिहाय माहिती संकलित करून सादर करण्याच्या सूचना जलसंधारण, जलसंपदा आणि लघुपाटबंधारे विभागांना देण्यात आल्या.

चारा लागवडीसाठी योग्य असलेल्या महसूल विभागाच्या जमिनी, पडीक जमिनी आणि इतर उपलब्ध क्षेत्रांची माहिती तहसीलदारांनी तयार करावी. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गाळपेर क्षेत्र, गायरान क्षेत्र तसेच महसुली पडीक जमिनींवर चारा लागवड करण्यास इच्छुक असलेल्या पशुपालक व शेतकऱ्यांची यादी तयार करून तहसीलदारांकडे सादर करावी.  तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गावनिहाय पशुधन संख्या, उपलब्ध चाऱ्याची स्थिती आणि भविष्यात चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वैरण बियाण्यांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करणार -
वैयक्तिक लाभाच्या वैरण बियाणे योजनेव्यतिरिक्त शेतकरी गट किंवा महिला बचत गटांकडून अतिरिक्त बियाण्यांची मागणी आल्यास जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मागणी सादर करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. डीपीसीअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी तालुका कृषी अधिकारी आणि तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी निर्धारित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) निवडलेल्या लाभार्थ्यांना क्षेत्रीय स्तरावर बियाण्यांचे वितरण करावे. शेतकऱ्यांपर्यंत बियाणे वेळेत पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

भविष्यात चारा टंचाई निर्माण झाल्यास खरेदी केलेल्या चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी उपलब्ध गोदामांची माहिती संकलित करून सादर करावी. सुका आणि ओला चारा साठविण्यासाठी योग्य जागांची निश्चिती करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

१७३ संस्थांशी समन्वय साधून जनजागृती करा -
चारा टंचाई व्यवस्थापनासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे गावनिहाय वितरण करण्यासाठी संबंधित संस्थांनी पुढाकार घ्यावा. कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी चारा लागवड, वैरण बियाणे वाटप आणि शासनाच्या विविध योजनांबाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 जिल्ह्यातील १७३ संस्थांच्या प्रतिनिधींशी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चारा उपलब्धता व नियोजनाबाबत चर्चा करावी. तसेच शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन आवश्यक माहिती संकलित करावी आणि उपाययोजनांचे नियोजन पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.

 पाणीटंचाई निवारणासाठीही गावनिहाय आराखडे तयार करा -
चारा टंचाईबरोबरच संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. प्रत्येक गावाचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करून बंधाऱ्यांची आणि बोअरवेलची दुरुस्ती प्राधान्याने करावी. ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन आराखड्यांची तपासणी करावी, तसेच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

क्षेत्रीय भेटींचे छायाचित्रण आणि व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करावी. चारा व पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.





  Print






Related Photos