चिमुकल्या हातांनी उजळवली ज्ञानाची ज्योत : मोहसीनभाई जव्हेरी विद्यालयात दिवाळीचा आनंदोत्सव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कुणाच्या हातात रंगीबेरंगी आकाशकंदील, कुणाच्या कल्पनेतून साकारलेली आकर्षक रांगोळी, तर कुणाच्या चेहऱ्यावर पणत्यांच्या प्रकाशापेक्षाही अधिक तेजस्वी हास्य... अशा उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींच्या कल्पकतेने आणि उत्साहाने संपूर्ण शाळा जणू प्रकाशाच्या उत्सवात न्हाऊन निघाली होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्य असमा खान, पर्यवेक्षिका सुनीता कांबळे, प्रा. भाग्यश्री आमटे, शिक्षिका रिता वानखेडे आणि पंकज साळवे उपस्थित होते. दीपावलीचे महत्त्व आणि परंपरा याविषयी बनकर सर यांनी विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्राचार्य असमा खान यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञान, संस्कार आणि सकारात्मकतेच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणारा उत्सव आहे, असे सांगितले. तसेच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवानिमित्त विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेचा सुंदर आविष्कार घडविला. शाळेच्या परिसरात विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या.
स्वतःच्या हातांनी तयार केलेले विविध आकारांचे आणि रंगांचे आकाशकंदील शाळेच्या सजावटीत विशेष आकर्षण ठरले. ठिकठिकाणी लावलेल्या पणत्या आणि आकर्षक रोषणाईमुळे संपूर्ण शाळा उजळून निघाली. फुलझडीच्या रोषणाईने विद्यार्थिनींच्या आनंदाला आणखी उधाण आले. हास्य, उत्साह आणि प्रकाशाने भरलेला हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.
या आनंदोत्सवात शैक्षणिक यशाचाही गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थिनींना प्राचार्य असमा खान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या आनंदात आणखी भर पडली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक प्रशांत बनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विद्यार्थिनींच्या कल्पकतेने सजलेली शाळा, पणत्यांच्या प्रकाशात उजळलेले वातावरण आणि यशाच्या कौतुकाने खुललेले चेहरे, अशा सुंदर संगमातून मोहसीनभाई जव्हेरी विद्यालयातील दीपोत्सव केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता आनंद, संस्कार, सर्जनशीलता आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ठरला.




Petrol Price




