महत्वाच्या बातम्या

 कारला मागून जोरदार धडक : वाहन पलटी होऊन दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर कोर्धा गावाजवळ उभ्या असलेल्या कारला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाले. अपघातात नितीन विनायक भरे (३२) आणि श्रावणी बेदरे (१२) यांचा मृत्यू ,झाला तर हिमेश बेदरे यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.

ही दुर्घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० ते १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील विरली येथील हिमेश बंडू बेदरे हे आपल्या कुटुंबीयांसह बल्लारपूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून बोडेगाव येथे परतताना नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील भोतमांगे ढाब्यावर त्यांनी जेवण केले.

जेवण आटोपून बोडेगावकडे जात असताना कोर्धा गावाच्या काही अंतरावर नितीन विनायक भरे हे वाहन चालवत होते. चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी त्यांनी कार रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. त्याचवेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली.

अपघाताचा आवाज ऐकून तसेच घटनास्थळी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मदत करत कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, नितीन भरे आणि श्रावणी बेदरे यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळी न थांबता पसार झाले. या प्रकरणी जखमी हिमेश बेदरे यांच्या जबाबावरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार करीत आहेत.





  Print






Related Photos