महत्वाच्या बातम्या

 अतिवृष्टीमुळे धान उत्पादक शेतकरी संकटात : तातडीने नुकसानभरपाई व धान बोनस देण्याची शिवसेनेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाची मदत व धान बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदार भामरागड यांच्यामार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुका हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून येथील बहुतांश शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. मात्र यावर्षी निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे अनेक भागातील शेतजमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मंजूर करावी, तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा धान बोनस तातडीने वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील पर्जन्यमान, पिकांची परिस्थिती, उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यांचा तातडीने सर्वे करून भामरागड तालुका दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती व पीक नुकसान मदत शासनाच्या नियमांनुसार उपलब्ध करून द्यावी, तसेच कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे विनोद पुंगाठी, जगदीश दुर्वा,रामाजी मडावी, दिलीप पुंगाठी,पेडू मज्जी  तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






Related Photos