आदिवासी विकास कार्यालयात नवचेतना ऋणानुबंध : माजी-आजी विद्यार्थ्यांमधील सेतू कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली नुकताच नवचेतना- ऋणानुबंध: माजी- आजी विद्यार्थ्यांमधील सेतू कार्यक्रम अपर आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील बेलदा शासकीय आश्रमशाळेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. यात रमेश कुमरे, जिल्हा कोषागार अधिकारी, भंडारा (से.नि.), मधुकर उईके, ऑल इंडीया ट्रायबल एम्प्लॉयीज फेडरेशन, शांता कुमरे, जि.प. सदस्य, नंदकीशोर धोंडुजी उईके, सचिव टीक्की संस्था तथा संस्थापक, एन.के.उद्योग समुह, नाशिक, अशोक शिवाजी मसराम, वरिष्ठ व्यवस्थापक, इंडीयन बँक, विजय जंगलु कोकोडे, शिक्षण विस्तार अधिकारी हिरामन कुमरे, भूजल विकास यंत्रणा लेखाधिकारीरमेश कोकोडे, पोलिस दलातील आर्मर देवराम सलामे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची संकल्पना दिपावलीनिमित्त गावोगावी होत असलेल्या मंडई या सांस्कृतिक कार्यक्रमात उक्त ऋणानुबंध संघ एकत्रित आल्यानंतर स्वयंस्फूर्त पध्दतीने एकमताने ठरविण्यात आलेली आहे. सर्व सहभागी मान्यवरांनी त्यांच्या शालेय जीवनातील व तत्कालीन अडी-अडचणींबाबत स्मृतींना उजाळा दिला. तसेच येत्या काळात शासकीय आश्रमशाळा बेलदा येथे ऋणानुबंध संघातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गावामध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्याचे मानस मांडले. ऋणानुबंध संघाकडून येत्या काळात दरवर्षी इयत्ता दहावी व बारावी मधील प्रथम,व्दितिय, तृतीय क्रमांक पटकविण्याऱ्या बेलदा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शांताबाई कुमरे यांनी बेलदा आश्रमशाळेला विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय नव्याने सुरू करण्याची मागणी अपर आयुक्त महोदयासमक्ष मांडली. अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मागणी मान्य करुन ऋणानुबंध संघातील सहभागी सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन अपर आयुक्त कार्यालय, नागपूर यांचे अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांतील माजी विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध संघ स्थापित करुन याप्रकारचे कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले.
अपर आयुक्तांच्या हस्ते मान्यवरांना गोंडी पेंटींग देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांचे आभार उपायुक्त दशरथ कुळमेथे यांनी मानले.
News - Nagpur