दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चंद्रपूर पोलीस दलाचा पुढाकार : मुख्यमंत्री सहायता निधीत १८ लाखांचे योगदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. पोलीस दलातील अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनातून तब्बल १८ लाख १४६ रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे.
राज्यात यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि शासनाच्या मदतकार्यात हातभार लागावा, या उद्देशाने चंद्रपूर पोलीस दलाने हा पुढाकार घेतला.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार दुष्काळ निवारणासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने देण्यात आले.
या माध्यमातून एकूण १८ लाख १४६ रुपये जमा झाले असून ही संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे. संकटाच्या काळात केवळ कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार न पाडता समाजाप्रती असलेले कर्तव्यही चंद्रपूर पोलीस दलाने जपले आहे. बळीराजाच्या संकटात त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा पोलीस दलाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.




Petrol Price




