क्रेशर चोरीचा छडा : यवतमाळात कोरपणा पोलिसांनी मशीनसह संशयिताला पकडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपणा येथून चोरीला गेलेल्या क्रेशर मशीनचा तब्बल दीड महिन्यानंतर अखेर छडा लागला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावपर्यंत नेली आणि जयकिशन फेब्रिकेशन वर्कशॉपमधून चोरीचे क्रेशर मशीन हस्तगत केले. या कारवाईत एका सराईत गुन्हेगारास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
कोरपणा येथील राज वर्कशॉपसमोर उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आलेले क्रेशर मशीन चोरीला गेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. संबंधित मशीन नादुरुस्त असल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी मालकाने ते ९ जुलै रोजी वर्कशॉपमध्ये आणले होते. मात्र, वर्कशॉप मालक राजस्थानला जाणार असल्याने मशीन पंधरा दिवसांनी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मशीन वर्कशॉपसमोरील उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आले होते.
काही दिवसांनी मशीन घेण्यासाठी मालक तेथे पोहोचला असता मशीन गायब असल्याचे आढळले. परिसरात शोधाशोध करूनही मशीनचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर कोरपणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी तपासाची सूत्रे पोलीस हवालदार राकेश वाकुलकर यांच्याकडे सोपविली. चोरीचे मशीन आणि आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीने या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. चोरीचे क्रेशर यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे २८ सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार राकेश वाकुलकर आणि पोलीस शिपाई विशाल मोरे यांचे पथक मारेगावकडे रवाना झाले. तेथे शोध घेत असताना जयकिशन फेब्रिकेशन वर्कशॉपमध्ये चोरीला गेलेले क्रेशर मशीन आढळून आले. पोलिसांनी तत्काळ मशीन ताब्यात घेतले. त्यानंतर मशीन व संशयित आरोपीला घेऊन पोलीस पथक कोरपणा पोलीस ठाण्यात परतले.
जप्त केलेले क्रेशर मशीन पोलीस ठाण्याच्या हेडमोहररच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राकेश वाकुलकर आणि पोलीस शिपाई विशाल मोरे यांनी केली. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सातत्याने तपास करत परजिल्ह्यात जाऊन चोरीचा मुद्देमाल शोधून काढल्याने कोरपणा पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.




Petrol Price




