गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २१ सप्टेंबरला कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी


- एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके; शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्रशासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान तीनदिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींसाठी सोमवार, २१ सप्टेंबर रोजी भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आयोजित या शिवार फेरीचे उद्घाटन २० सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होत आहे.
शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले विविध पीक वाण, आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे. विशेष प्रात्यक्षिक क्षेत्रात सुमारे २५ एकरांवर २२८ विविध पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशी पाहता येणार आहेत. यामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस, चारा पिके, भाजीपाला व फुलपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे.
याशिवाय विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे सुमारे ३,२०० हेक्टर प्रक्षेत्र तसेच सुमारे २हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा पैदासकार बियाणे उत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांना पाहता येणार आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह कृषी विभाग, आत्मा, महाबीज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) तसेच विविध संस्थांचा या शिवार फेरीत सहभाग आहे. शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे कृषीशास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून शेतीविषयक शंकांचे निरसन करता येणार आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुधारित पीक वाण, आधुनिक लागवड पद्धती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी २१ सप्टेंबर रोजी शिवार फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ किशोर झाडे यांनी केले आहे.




Petrol Price




