सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात पोलिसांचा रूट मार्च


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आगामी पोळा, तान्हा पोळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत सुरक्षेची सज्जता दाखवून दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च पार पडला. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस ठाणे बल्लारपूर येथून रूट मार्चला सुरुवात झाली. गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी वॉर्ड, श्रीराम वॉर्ड, गांधी चौक, किल्ला वॉर्ड मार्गे गणपती विसर्जन घाटापर्यंत पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर याच मार्गाने परत येत पोलीस ठाण्यात रूट मार्चची सांगता झाली.
सण-उत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचा संदेश देतानाच पोलिसांची सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या रूट मार्चमध्ये सात पोलीस अधिकारी, ३३ अंमलदार, आरसीपीचे २१ जवान आणि क्यूआरटीचे पाच जवान सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, मदन दिवटे, शब्बीर पठाण तसेच पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, वैभव चव्हाण, डिसेंबर दिवटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी बल्लारपूर पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




