महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांना ऑनालाईन नोंदणी करण्याचे आवाहन : ॲग्रीस्टॅक या संकेतस्थळावरील शेतकरी क्रमांक नोंदणी बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : किमान आधारभूत धान खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थांमार्फत (बिगर आदिवासी क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व आदिवासी क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक) राज्यात एफ.ए.क्यु. (Fair Average Quality) दर्जाच्या धान व भरडधान्याची खरेदी करण्यात येते. योजनेंतर्गत शेतकऱ्यांची प्रत्येक हंगामामध्ये ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केली जाते. सदर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांकडून वेळापत्रकानुसार त्यांच्या धान्याची हमीभावानुसार खरेदी करण्यात येते.

त्यानुसार शेतकरी नोंदणी करण्यासाठी खरीप हंगाम २०२६-२०२७ करीता १ सप्टेंबर २०२६ ते १५ ऑक्टोंबर २०२६ व रब्बी हंगामामध्ये ०१ एप्रिल २०२७ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत खरेदी केंद्र सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीमध्ये आधार क्रमांक, आधारकार्डशी संलग्न असलेले बचत बँक खाते क्रमांक, ७/१२ उतारे, पिक पेरा, कृषी विभागाकडून लागु करण्यात आलेल्या AGRISTACK या संकेतस्थळावरील शेतकरी क्रमांक (फार्मर आयडी) वरीलची नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. जर खरेदी केंद्रावर नोंदणी करीता शुल्काची मागणी होत असल्यास संबंधित अभिकर्ता संस्था, सहकार विभाग व जिल्हा पुरवठा कार्यालयास त्याबाबत अवगत करावे.

त्याअनुषंगाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभमिळण्याकरीता प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, गडचिरोली या कार्यालया अंतर्गत असलेले ५४ केंद्र, उप प्रादेशिक व्यवस्थापक, कार्यालय अहेरी या कार्यालयांतर्गत असलेले ३७ केंद्र व जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली या कार्यालयांतर्गत असलेले २२ केंद्र असे एकूण ११३ खरेदी केंद्र जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे कडून मंजूर करण्यात आलेले असून वरील सर्व खरेदी केंद्रावर जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली, मनोज डहारे यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos