महत्वाच्या बातम्या

 महाविद्यालयाचे कुलूप तोडून दोन लॅपटॉप लंपास : प्राचार्यांची पोलिसांत धाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीचे केंद्र असलेल्या घुग्घुस येथील चिंतामणी महाविद्यालयातच चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. महाविद्यालयाचे कुलूप तोडून कर्मचारी कक्षातील कपाटात ठेवलेले एचपी कंपनीचे दोन जुने लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या घटनेत सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ३ ऑक्टोबर रोजी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य संजय महादेवराव आसुटकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्राप्त माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील प्राचार्य आणि इतर कर्मचारी कामकाज आटोपून घरी गेले. त्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयातील सर्व दरवाजे आणि मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. दुसऱ्या दिवशी, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त महाविद्यालयाला सुटी असल्याने परिसर बंद होता. मात्र, याच बंद कालावधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतल्याचा संशय आहे.

३ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास महाविद्यालयातील शिपाई मनीष झोडे यांनी प्राचार्यांना दूरध्वनी करून दरवाजाचे कुलूप तुटलेले असून, दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच प्राचार्यांनी तातडीने महाविद्यालय गाठले. तेथे पोहोचल्यानंतर दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. महाविद्यालयाच्या आतील भागाची पाहणी केली असता कर्मचारी कक्षातील कपाटात ठेवलेले दोन लॅपटॉप गायब असल्याचे लक्षात आले.

महाविद्यालयातील कामकाजासाठी वापरले जाणारे हे दोन लॅपटॉप चोरून नेल्याचे प्राचार्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चोरीची घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आल्यानंतर प्राचार्यांनी ८ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा तपास करून चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





  Print






Related Photos