महत्वाच्या बातम्या

 एनसीएमसी कार्ड योजनेचा पहिल्याच आठवड्यात फज्जा


- सर्व्हर डाऊनमुळे महिलांसह ज्येष्ठांना सवलतीचे तिकीट मिळेना; अखेर १४ सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकीटाचा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी लागू केलेल्या एनसीएमसी कार्ड योजनेला सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींचा फटका बसला आहे. १ सप्टेंबरपासून सवलतीचे तिकीट घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आले; मात्र योजनेच्या पहिल्याच दोन दिवसांत सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळू शकले नाही. परिणामी, कार्ड असूनही काही प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला.

या प्रकारामुळे प्रवासी आणि एसटी वाहकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले.एनसीएमसी कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स नसल्यास ते रिचार्ज करण्याची सुविधा वाहकांकडे असलेल्या तिकीट मशीनमधून उपलब्ध आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड रिचार्ज करणे तसेच सवलतीच्या दरात तिकीट काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे कार्डधारक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

कार्ड असूनही पूर्ण तिकीटाचा भुर्दंड -
एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्डचा वापर अनिवार्य केला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी बसमध्ये चढल्यानंतर वाहकाकडे कार्ड दाखवून सवलतीचे तिकीट मागितले. मात्र, सर्व्हरशी संपर्क होत नसल्याने वाहकांच्या मशीनवर सवलतीचे तिकीट निघत नव्हते.काही प्रवाशांच्या कार्डमध्ये बॅलन्स नसल्याचे दिसून आले. सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांचे कार्ड रिचार्ज करणेही शक्य झाले नाही. परिणामी, सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्ड काढलेले असतानाही त्यांना पूर्ण भाड्याचे तिकीट घ्यावे लागले. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली.

विशेष म्हणजे वाहकांकडे असलेल्या मशीनमधून या कालावधीत केवळ पूर्ण भाड्याचे तिकीट, १२ वर्षांखालील मुलांचे तिकीट आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन रुपये भरून काढण्यात येणारे तिकीटच निघत होते. महिलांसह अन्य पात्र सवलतधारकांना सवलतीचे तिकीट देण्यात तांत्रिक अडथळे निर्माण झाले.

वाहकांनाही मनस्ताप -
कार्ड असूनही सवलतीचे तिकीट मिळत नसल्याने काही प्रवाशांनी वाहकांकडे नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी प्रवाशांनी वाहकांसोबत हुज्जत घातल्याचेही प्रकार घडले. प्रत्यक्षात तांत्रिक बिघाडामुळे तिकीट काढता येत नसतानाही वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बुधवारी सायंकाळपर्यंतही परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे एकीकडे सवलतीच्या प्रवासासाठी कार्ड काढलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, तर दुसरीकडे वाहकांवरही अनावश्यक तणाव निर्माण झाला.

अखेर महामंडळाकडून मॅन्युअल तिकीटाचा तोडगा -
दोन दिवसांच्या गोंधळानंतर एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने बुधवारी सायंकाळी यावर तात्पुरता तोडगा काढला. वाहतूक महाव्यवस्थापकांनी महाराष्ट्रातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना सर्व्हर डाऊन असल्यास १४ सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय, ज्या प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे; मात्र अद्याप त्यांना कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांनाही दिलासा देण्यात आला आहे. संबंधित प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केल्याची पावती दाखविल्यास त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, तांत्रिक यंत्रणा सुरळीत होईपर्यंत मॅन्युअल तिकीटाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

यंत्रणा सज्ज नसताना योजना सुरू केल्याचा आरोप -
दरम्यान, एसटी महामंडळाने आवश्यक तांत्रिक यंत्रणा पूर्णपणे सज्ज नसतानाच एनसीएमसी कार्ड योजना लागू करण्याची घाई केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे. सर्व्हर आणि तिकीट मशीनमधील तांत्रिक अडचणींचा थेट परिणाम वाहकांच्या कामावर होत असून, त्यांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

एसटी महामंडळ प्रशासनाने यंत्रणा सज्ज नसताना एनसीएमसी कार्ड सुरू करण्याची घाई केली. त्यामुळे वाहकांना कर्तव्य बजावताना अडचणी येत असून, त्यांचे प्रवाशांसोबत वाद होत आहेत. प्रशासनाने तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून वाहक आणि प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

एनसीएमसी कार्ड योजनेचा उद्देश सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल करणे हा असला, तरी सुरुवातीलाच आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सर्व्हर आणि तिकीट प्रणाली किती लवकर सुरळीत होते, याकडे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos